घोलवड हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वसलेले एक स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील गाव आहे. जगप्रसिद्ध चिकू उत्पादनामुळे या गावाला विशेष ओळख मिळाली आहे. घोलवडच्या चिकूस भौगोलिक संकेत (GI TAG) मिळाल्यामुळे या गावाची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. गावात सुमारे ५०० हेक्टर चिकू बागायती क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील तिसरे ‘मधाचे गाव’ आणि पालघर जिल्ह्यातील पहिले मध-गाव म्हणून घोलवडची निवड झाली असून, हजारो पर्यटक येथे भेट देतात.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले घोलवड हे हिरव्यागार बागा, स्वच्छ समुद्रकिनारा आणि शांत वातावरणामुळे पर्यटनासाठी आकर्षक केंद्र म्हणून विकसित होत आहे. घोलवड रेल्वे स्टेशनमुळे प्रवास सोयीस्कर झाला आहे. गुजरात सीमेच्या जवळ असल्याने व्यापार व रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
गावात मोठ्या प्रमाणात मॅंग्रोव्ह (कांदळवन) आढळते, जे पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. घोलवडमध्ये पारंपरिक बांबूपासून हस्तकलेच्या वस्तू तयार करणारे कारागीर मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्र पर्यटन व भारतीय हस्तकला विभागाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे कारागिरांनी १५० विविध हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य मिळवले आहे. या वस्तूंना सोशल मीडियावर मोठी मागणी असून महिला व युवकांना रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.
घोलवडमध्ये मत्तामाता मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर, जैन मंदिर, चेडोबाप्पा मंदिर आणि शीतला माता मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. दरवर्षी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात.
प्रसिद्ध घोलवड–बोर्डी चिकू महोत्सव हा गावाचा मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम असून देश–विदेशातून पर्यटक येथे येतात. गावातील ३४ एकरचा निसर्गरम्य तलाव विशेष आकर्षण असून पक्षीनिरीक्षकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. २०२३–२४ मध्ये घोलवडला ‘स्वच्छ आणि सुंदर गाव’ पुरस्कार मिळाला आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार घोलवडचा गाव कोड ५५१५८३, एकूण क्षेत्रफळ ११३७.९५ हेक्टर, लोकसंख्या ४,४०३ (पुरुष २,१९१ व महिला २,२१२) आहे. साक्षरता दर ७४.४३%, पुरुष ८०.२८% आणि महिला ६८.६३% आहे. गावात ९९४ घरकुले आहेत. पिनकोड ४०१७०२ आहे. प्रशासन गावाच्या सरपंचांद्वारे पाहिले जाते. घोलवड डहाणू विधानसभा व पालघर लोकसभा मतदारसंघात येते. दहाणू हे १५ किमी अंतरावरील जवळचे प्रमुख शहर आहे.
